अजिंठ्याचे वैशिष्ट्य - जातककथांचे चित्रांकन


अजिंठा लेणेअजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने क्रमांक दिलेली एकूण ‘तीस’ लेणी आहेत. ती सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात ‘विहार’ व ‘चैत्यगृह’ या दोन प्रकारच्या लेण्यांचा समावेश आहे. लेणी क्रमांक नऊ, दहा, अकरा, सव्वीस आणि एकोणतीस ही चैत्यगृहे म्हणजे भिक्षूंना उपासनेसाठी कोरलेली लेणी होत. बाकीची सर्व लेणी ‘विहार’ म्हणजे भिक्षूंना पावसाळ्यात राहण्यासाठी (वस्सावास-वर्षावास) कोरलेली निवास्थाने आहेत.

बौद्ध धर्मात ‘हीनयान’ आणि ‘महायान’ असे दोन पंथ आहेत. त्यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे ‘हीनयान’ पंथीय अनुयायी मूर्तिपूजा करत नाहीत. त्याऐवजी ते भगवान बुद्धां च्या प्रतीकांची- बोधिवृक्ष, चरणचिन्ह, धर्मचक्र-पूजा करतात, तर ‘महायान’ पंथीय भगवान बुद्धांच्या मूर्तीची पूजा करतात.

लेणी क्रमांक आठ, नऊ, दहा, बारा, तेरा आणि पंधरा-‘अ’ही ‘हीनयान’ लेणी आहेत. तर लेणी क्रमांक एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, अकरा, चौदा आणि पंधरा ते तीस ही ‘महायान’ लेणी आहेत.

‘हीनयान’ लेण्याचा काळ इसवी सनपूर्व दुसरे शतक ते इसवी सनाचे दुसरे-तिसरे शतक असा येतो. काही लेण्यांत ब्राम्ही लिपीतील लेख आहेत.

विदर्भात ‘वाकाटक’ राजवंशाच्या दोन शाखा नांदत होत्या. थोरली शाखा ‘नंदिवर्धन’ (आजचे नगरधन, रामटेकजवळ, जिल्हा नागपूर) तर धाकटी ‘वत्सगुल्म’ (आजचे वाशिम, जिल्हा वाशिम) येथे नांदत होती. या शाखेतील नृपती ‘हरिषेण’ याच्या राज्यकाळातील दोन मोठे संस्कृत शिलालेख अजिंठा लेण्यात आहेत. ‘लेणे क्रमांक सोळा’मध्ये समोरच्या सज्जात (Verandah) डाव्या हाताला वर भिंतीवर लेख आहे. तो ‘हरिषेणा’चा मंत्री वराहदेव याचा, तर ‘लेणी क्रमांक सतरा’मध्ये सज्जात डाव्या हाताला भिंतीवर लेख आहे, तो हरिषेण नृपतीच्या एका मांडलिक वंशाचा. वाकाटक राजे प्रख्यात गुप्त राजवंशाचे समकालीन होते. अर्थात, अजिंठा लेण्यातील महायान पंथीय गुंफातील चित्रे ही गुप्त वाकाटकांच्या वैभवशाली सुवर्णयुगीन राज्यकालातील आहेत.
 

अजिंठ्यातील भित्‍तीचित्रअजिंठ्यातील बुद्धाचे चित्रअजिंठा लेणी विश्वविख्यात आहेत, ती त्या लेण्यांतील अप्रतिम चित्रांसाठी. चित्रांचा मुख्य केंद्रबिंदू आहे भगवान गौतम बुद्ध. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग लेण्यांत रंगवलेले आहेत. जसे की त्यांचा जन्म, गृहत्याग (महाभिनिष्क्रमण), ‘मार’ नामक राक्षसाने त्यांना तपस्येपासून परावृत्त करण्यासाठी केलेला प्रयत्न (मार संमोहन), श्रावस्तीचा चमत्कार (भगवान बुद्धांनी एकाच वेळी एक हजार ठिकाणी प्रकट होणे), नालगिरी नामक मत्त हत्तीचे दमन, भगवान बुद्ध, राहुल, यशोधरा.
 

पण या चित्रसृष्टीचा मोठा भाग व्यापला आहे तो जातककथांनी. जातक म्हणजे जन्म. भगवान बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथा म्हणजे जातककथा होत. पूर्वजन्मांमध्ये त्यांना बोधिसत्त्व म्हणत असत. बोधिसत्त्व म्हणजे बुद्ध होण्याचे सत्त्व ज्याच्यामध्ये आहे असा, भावी काळात संबोधी प्राप्त करून घेणारा असा. अजिंठा लेण्यात ‘छत्तीस’ जातककथांची चित्रे रंगवलेली आहेत.
 

बौद्ध आचार्य आणि पंडित यांनी भारतीय साहित्यात प्रचंड भर घातली. त्यांपैकी ‘महाकवी अवघोष’ यांचे ‘सौंदरनंद’ हे नाटक प्रख्यात आहे. ती कथा आहे सुंदरी आणि नंद यांची. नंद याने तथागत भगवान बुद्ध यांच्या उपदेशाने संन्यास घेण्याची नाटकातील प्रसंगांची चित्रे अजिंठा लेण्यात आहेत.
 

अजिंठा लेण्यातील चित्रे राजे, राजमहाल, राजपुत्र, राजकन्या- त्यांच्या भव्य मिरवणुकी, भिक्षू, भिक्षूणी, पुरोहित, शिकारी, साप खेळवणारे गारुडी, दास-दासी, यक्ष-यक्षिणी (संपत्तीच्या देवता), गंधर्व (स्वर्गातील गायक), अप्सरा, किन्नर (अर्धा पुरुष-अर्धा कोंबडा), विद्याधरी-(आकाशातून उडत देवासाठी पुष्पमाला घेऊन येणार्‍या देवता), व्यापारी, नर्तकी, ज्योतिषी, साधू-संन्यासी, हत्ती, घोडे, बैल, मगर, नाना प्रकारच्या वनस्पती, फुले, नक्षी, वेलपत्री अशी सर्वांगसुंदर व अद्भुत आहेत.
 

लेण्यांच्या भिंती पार गुळगुळीत न करता किंचित खडबडीत ठेवत. त्यामुळे त्यावर लेप लावता येई. लेप बारीक वस्त्रगाळ असे. प्रस्तर चूर्ण, माती, वनस्पतींचे रेशे (fibres), तांदळाचे भूस, गवतस इत्यादी लावून अगदी सपाट चोपून घेत. त्यावर पुन्हा तसलाच थर देत. त्यावर चुन्याचा अगदी पातळ थर देत. अशा प्रकारे चित्रे काढण्यासाठी ‘जमीन’ (पार्श्वभूमी) तयार झाली की त्यावर गेरूच्या रंगात चित्राची बाह्यरेषा काढली जायची. अजिंठ्याच्या चित्रातील बाह्यरेषा इतक्या जोरदार, सकस, ठाशीव आणि ठसठोंबस आहेत की काही चित्रे जर अंधुक प्रकाशात पाहिली तर ती भरीव शिल्पांसारखी दिसतात. त्यात रंग भरले जात. रंग देशी आणि वनस्पतीजन्य असत. चुना, हळद, हिरडा (मंजिष्ठ-लाल रंग), हरताळ-(पिवळा), काजळ यांपासून तयार केले जाते. त्यात डिंक घालून-उत्तम खलून-घोटून घेतले जात. निळा रंग मात्र राजवर्ख, राजावर्त, (लाजावर्त Lapiz Lazuli) नामक निळ्या रत्नापासून करत. हे रत्न इराण-अफगणिस्तान भागातून येई.
 

अजिंठा लेणीतील चित्रकलेचा अप्रतिम नमुना चित्रातील भाव (mood) जाणून रंगसंगतीची योजना केलेली आहे. चित्राचा भाव आनंदी असेल तर उज्ज्वल रंग (लाल, पिवळा) आणि उदास असेल तर काळा, उदाहरणार्थ मातकट वापरला आहे. चित्रातील स्त्री-पुरुष, वनस्पती, वृक्ष-वेली यांचा मेळ उत्तम साधला आहे. चित्रात सूक्ष्म तपशील भरले आहेत. झाडावरून जाणारी मुंगळ्यांची रांगही त्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. केशरचना, वस्त्रे, अलंकार यांचे अक्षरश: असंख्य नमुने तेथे पाहायला मिळतात.
 

अजिंठा येथील लेणी ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंतच्या काळात खोदण्यात आली. त्यातली सर्वांत प्राचीन लेणी पैठणच्या शातकर्णीच्या वेळची असून ती हीनयान पंथाची आहेत.
 

नैसर्गिकरीत्या आणि जास्त करून मानव विध्वंस यामुळे लेण्यांतील बहुतांश चित्रे नष्टप्राय झाली आहेत. केवळ तेरा लेण्यांतील चित्रे शिल्लक आहेत. त्यांतल्या त्यांत एक, दोन, नऊ, दहा, बारा, सोळा, सतरा व एकोणीस या लेण्यांतील चित्रे सुरेख आहेत.
 

अजिंठ्याच्या चित्रांचे तीन विभाग आहेत -

१) अलंकारिक चित्रे
२) मानवी आकृतीचे यथातथ्य रेखांकन असलेली चित्रे
३) कथानकपर चित्रे

अजिंठ्यातील आणखी एक चित्रपहिल्या विभागात पशू, पक्षी, कल्पित प्राणी व यक्षगंध यांचा समावेश आहे.
 

दुसर्‍या विभागात लोकपाल, बुद्ध व बोधिसत्त्व यांचा मुख्यत्त्वे समावेश होतो. बुद्धाचे समग्र जीवनच या ठिकाणी चित्रित झाले आहे.
 

तिसर्‍या विभागात जातककथांचा समावेश आहे. सोळा, सतरा व एकोणीस या क्रमांकांची लेणी स्थापत्य व चित्रकला या दोन्ही दृष्टींनी भारतातल्या कुठल्याही लेण्यांपेक्षा उत्कृष्ट आहेत असे बर्जेस यांनी म्हटले आहे.
 

त्यांतले सोळावे लेणे वाकाटक नृपती हरिषेण याच्या वराहदेव नावाच्या सचिवाने आपल्या मातापित्यांच्या पुण्योपचयासाठी खोदले आहे. हे लेणे अनेक बाबतींत अत्युत्कृष्ट गणले जाते.
 

त्याची ओसरी किंवा पडवी पासष्ट फूट लांब व सुमारे अकरा फूट रुंद असून तिला मध्यभागी अष्टकोनी स्तंभ आहेत. ओसरीतून आतल्या मंडपात जायला तीन दरवाजे आहेत. मोठ्या दरवाजाच्या चौकटीच्या बाजूच्या लहान स्तंभांवर दोन्ही अंगी मकरवाहन गंगेची मूर्ती खोदलेली आहे. आतल्या मंडपाचा पुढील संपथ (कॉरिडॉर) मागील संपथापेक्षा लांब म्हणजे चौर्‍याहत्तर फूट आहे. त्याच्या पाठीमागे चैत्य मंदिर असून त्यात जाण्यास तीन दरवाजे आहेत. मध्यभागी बुद्धाची भव्य मूर्ती सिंहासनावर अधिष्ठित आहे. ती धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेत आहे. बुद्धाच्या मुखाभोवती तेजोवलय असून त्याच्या दोन्ही अंगी वज्रपाणी व पद्मपाणी चव-या घेऊन उभे आहेत. मंडपाच्या दोन्ही बाजूंस प्रत्येकी सहा, मागच्या भिंतीत दोन व ओसरीच्या उभय अंगी दोन अशा एकंदर सोळा लहान खोल्या भिक्षूंकरता खोदलेल्या आहेत.
 

बुद्धाच्या शेवटच्या जन्मातले प्रसंग सोळाव्या लेण्यात चित्रित झाले आहेत. मंडपात प्रवेश करून उजव्या बाजूच्या भिंतीवरची चित्रे ओळीने पाहत गेल्यास ती बुद्धाच्या चरित्रातल्या घटनांना अनुलक्षून क्रमाने काढली आहेत असे दिसते.
 

अजिंठा लेणे क्रमांक सोळा मधील भित्‍तीचित्र. 'नंदाचे परिवर्तन'प्रसंगमालिकांतल्या शेवटच्या प्रसंगाचे चित्र चांगल्या स्थितीत असून कलासमीक्षकांनी त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. नंदाने बुद्धाचा धर्म स्वीकारून भिक्षुजीवन जगण्याचा निश्चय केल्यावर त्याचा राजमुकूट त्याची पत्नी सुंदरी हिच्याकडे एका सेवकाने आणून दिला. तो पाहून सुंदरी शोकावेगाने मरणोन्मुख झाली हा त्या चित्राचा विषय आहे. शोक, कारुण्य आणि सुस्पष्ट प्रसंगचित्रण या बाबतीत या चित्राला मागे टकणारी कलाकृती कलेच्या इतिहासात आढळणार नाही, असे ग्रिफिथ म्हणतो. त्या चित्रांतल्या भावना त्यापेक्षा जास्त प्रभावी रंगवणे जगात कोणालाही शक्य झालेले नाही. चित्रांत वाकाटककालीन चित्रकलेने उच्चांक गाठला असे म्हणता येते.
 

अजिंठ्याची लेणी ‘नाग’ कारागिरांनी खोदली असल्याने नागराजांच्या प्रतिमा, सोळाव्या क्रमांकाच्या लेण्यामधून खाली उतरले असता (नागराजाचे) लहानसे लेणे लागते तेथे आढळतात. असे वा.वी. मिराशी यांनी लिहून ठेवले आहे.
 

अजिंठ्याच्या चित्रकलेतल्या तांत्रिक पूर्णतेचा परिणाम मनावर अधिक होतो, की त्या चित्रातल्या भावनात्मक प्रगाढतेचा अधिक होतो, हे सांगणे कठीण आहे असे डॉ.आनंद कुमारस्वामी म्हणतात. या चित्रकलेला स्त्रीपुरुषांच्या आंतरिक भावनेची पूर्ण जाणीव आहे. एवढेच नव्हे; तर पशुपक्ष्यांनाही अंत:करण असते हीही जाणीव आहे. त्यामुळे या कलेला अमरत्व प्राप्त झाले आहे. (सह्याद्रि, वाकाटक नृपति व त्यांचा काल, डॉ.मोतीचंद्र)
 

प्रख्यात चिनी प्रवासी युअन च्वांग हा इसवी सन ६३०-६४४ या काळात भारतात प्रवास करत होता. त्याने अजिंठ्याचे वर्णन केले आहे. त्यावरून इसवी सनाच्या सातव्या शतकात अजिंठ्याची ख्याती होती असे दिसते. अजिंठा लेणी क्रमांक सत्तावीसमध्ये राष्ट्रकूट राजवंशातील नृपतीचा शिलालेख आहे. तो इसवी सनाच्या नवव्या शतकातील आहे. त्यावरून इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंततरी ही लेणी विस्मृतीच्या अंधकारात गेली नव्हती. लेण्यांचा वापर इसवी सनाच्या दहाव्या–अकराव्या शतकानंतर बंद झाला. आजुबाजूला घनदाट जंगल वाढले. लेण्यांतही पावसाचे पाणी साठले. माती भरली.
 

अजिंठा लेण्‍याची भव्‍य कमानब्रिटिश अधिकारी कॅप्टन जॉन स्मिथ या दरीकडे शिकार करण्यासाठी १८१९ साली गेला. लेण्यांसमोरच्या पहाडावर (व्ह्यू पॉईंट) उभा असताना त्याला लेण्याची भव्य कमान दिसली आणि लेण्यांचा शोध लागला!

लेणी क्रमांक एक - हा अतिशय भव्य (६४ x ६४) विहार आहे. त्याचे घटोत्कच लेणींशी (जजाळ्याची अथवा गुलवाड्याची लेणी) साम्य आहे आणि घटोत्कच लेण्यात नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा शिलालेख आहे. त्यावरून ही लेणी वाकाटककालीन ठरतात.
 

घटोत्कच लेणी- अजिंठा लेण्यांकडे जाताना गोळेगावापासून डावीकडे पंधरा किलोमीटरवर असलेल्या ‘अभई’पासून पुढे उजव्या हाताला बोरगावपासून जवळच अजिंठ्यासारखीच घटोत्कच लेणी आहेत. त्यात वाकाटक राजा हरिषेणाचा मंत्री ‘वराहदेव’ याचा शिलालेख आहे.

लेणी क्रमांक दोन - हा विहार किंचित (४८ x ४८ सुमारे) आहे.

लेणी क्रमांक तीन - पूर्ण झालेली नाहीत.

 • लेणी क्रमांक चार - हा अजिंठा लेणीसमुहातील सर्वांत मोठा विहार आहे. यांच्या समोरच्या भिंतीवर अष्टमहाभ यांचा शिल्पपट आहे.
 • लेणी क्रमांक पाच - अपूर्ण आहेत.
 • लेणी क्रमांक सहा - लेणी दुमजली आहेत. यात काही बुद्धमूर्ती आहेत.
 • लेणी क्रमांक सात - ही विहार लेणी आहे. यात श्रावस्तीच्या चमत्काराचा शिल्पपट आहे.
 • लेणी क्रमांक आठ - ही लेणी बरीचशी नष्ट झाली आहे.
 • लेणी क्रमांक नऊ - हे चैत्यगृह आहे. चैत्यगृहात (४५’x २३’x २३’) एकवीस स्तंभ आहेत.
 • लेणी क्रमांक दहा - अजिंठा लेणीसमुहातील सर्वात मोठे चैत्यगृह ती अगदी सर्वप्रथम कोरली गेलेली लेणी आहेत. तेथील दोन प्राचीन ब्राम्ही लिपीतील शिलालेखावरून चैत्यगृहाचा काळ इसवी सनापूर्वीचे दुसरे शतक असा ठरतो.
 • लेणी क्रमांक अकरा - विहार छतावर काही चित्रे आहेत.
 • लेणी क्रमांक बारा - विहार अजिंठा लेणी समुहातील सर्वात प्राचीन विहार
 • लेणी क्रमांक तेरा-चौदा-पंधरा - सगळे विहार चांगली शिल्पे आहेत.
 • लेणी क्रमांक सोळा - विशाल आणि प्रमाणबद्ध (६६’x ६५’ x १५’) विहार.
 • लेणी क्रमांक सतरा - विहार लेणी
 • लेणी क्रमांक अठरा - म्हणजे लेणी क्रमांक एकोणीसकडे जाण्याचा मार्ग.
 • लेणी क्रमांक एकोणीस – चैत्यलेणी
 • लेणी क्रमांक वीस-एकवीस-बावीस-तेवीस-चोवीस-पंचवीस – विहारलेणीत फार शिल्पे वा चित्रे नाहीत.
 • लेणी क्रमांक सव्वीस - चैत्यलेणीत सर्वत्र बुद्धमूर्ती आहेत.

संकलन - राजेंद्र शिंदे
(ब्रम्हानंद देशपांडे यांच्या पुस्तकाधारे)
info@thinkmaharashtra.com

लेखी अभिप्राय

शिल्पकला तेव्हाच इतकी प्रगत होती. आता का सुधारणा नाही? प्रगल्‍भता का नाही? एम. एफ. हुसेन यांसारख्या चित्रकाराला देश का सोडावा लागतो? लेणी विद्रुप करुन, सुंदरतेला विद्रुप करणा-यांवर काहीही कारवाही का नाही?

shrikant petkar11/10/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

 • No HTML tags allowed.
 • Lines and paragraphs break automatically.
 • Web page addresses and email addresses turn into links automatically.