जीवनच गुरूकूल व्हावे!

0
36

‘नई तालीम’ ही महात्‍मा गांधी आणि विनोबा यांनी सुरू केलेली शिक्षणपद्धत. या पद्धतीचा उपयोग करून जीवन विद्यापीठ किंवा लिव्हिंग युनिव्‍हर्सिटीच्‍या साह्याने ‘निर्माण’ मधील तरूणांना ‘सर्च ’मध्‍ये प्रत्‍यक्ष समाजाच्‍या प्रश्‍नांवर काम करता करता ते प्रश्‍न सोडवण्‍याचे शिक्षण मिळावे, असा आमचा प्रयत्‍न आहे. त्‍या दृष्‍टीने ‘निर्माण’चे तरूण सर्चमध्‍ये, MKCL मध्‍ये, काही इतर संघटनांमध्‍ये प्रत्‍यक्ष काम करताना जीवनाचे शिक्षण घेतात.

‘नई तालीम’बद्दल गांधी-विनोबांची मांडणी अशी, की समाजात किंवा शिक्षणव्‍यवस्‍थेत सुरूवातीला वीस–पंचवीस वर्षे शिक्षण केवळ पुस्‍तकी स्‍वरूपात आणि क्‍लासरूममध्‍ये दिले जाते. हे शिक्षण जीवनविहीन आहे. त्याचा जीवनाशी काही संबंध नाही. व्‍यक्‍ती शिक्षण संपून कामास लागली, की ती घाण्‍याला जुंपलेल्‍या बैलासारखे काम करते. त्‍यानंतरच्‍या आयुष्‍यात तिचे काहीच शिक्षण होत नाही. यामुळे आपले आधीचे जीवन ‘जीवनविहीन शिक्षण’ आणि त्‍यानंतरचे आयुष्‍य ‘शिक्षणविहीन जीवन’ अशा दोन अधुर्‍या कप्यांत विभागले जाते. त्‍यासाठी ही कल्‍पना मांडण्‍यात आली. कर्तव्‍यकर्म करत असताना त्‍याद्वारे शिक्षण, हीच ‘नई तालीम’!

जीवन आणि शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी हे चौघेही एकत्र राहतात आणि एकत्र शिकतात, ही कल्‍पना म्‍हणजेच गुरूकूल पद्धत होय. मात्र गुरू-शिष्‍यांनी एकत्र राहणे, एकतत्रित अध्‍ययन करणे ही व्‍यवस्‍था प्रत्‍येक ठिकाणी शक्‍य आहेच असे नाही. त्‍यामुळे ‘नई तालीम’ ही पद्धत नेहमीच गुरूकूल पद्धतीने कायम राहील असे नाही. आणि आजच्‍या कनेक्‍टेड जगामध्‍ये गुरू आणि विद्यार्थी एकत्र असलेच पाहिजेत असेही नाही. प्रत्‍यक्ष भेटीचा आनंद आणि महत्‍त्‍व वेगळे असते, मात्र ते नेहमी एकाच कॅम्‍पसमध्‍ये राहतील अशातला भाग नाही. उदा. गांधींना मी कधी पाहिले नाही. विनोबाही आज माझ्यासोबत नाहीत. तरी दोघांपासून मी रोज शिकत असतो. मी त्‍या दोघांचा आयुष्‍यभराचा विद्यार्थी आहे. गुरूकूल ही पद्धत आजच्‍या प्रस्‍थापित शिक्षणपद्धतीला अल्‍टरनेटिव्‍ह कल्‍पना नाही. कारण ते वयाच्‍या कोणत्‍या टप्‍प्‍यापासून सुरू व्‍हावे हा सारासार विवेकाचा मुद्दा ठरतो. तसेच आज बहुतेक पालक सुशिक्षित आहेत. त्‍यामुळे मुलांचे मोठे शिक्षण हे कुटुंबातच होऊ शकते. त्‍यामुळे त्‍यांना लहानपणापासून पालकांपासून वेगळे ठेवण्‍याची गरज नाही. मात्र एका मर्यादेनंतर कुटुंबाबाहेरील गुरूची गरज पडते. त्‍यामुळे गुरूकूल या कल्‍पनेची महत्‍त्‍वाची जागा आहे. पण गुरूकूल स्‍थापन करणे जर शक्‍य नसेल तर सगळ्या जीवनालाच का गुरूकूल करून टाकू नये? गुरूकूल कोणत्‍याही चार भिंतींमध्‍ये बंद करणे शक्‍य नाही. त्‍याऐवजी जीवन हेच गुरूकूल अशी मांडणी करता येईल. एखाद्या ओपन युनिव्‍हर्सिटीसारखे. माझा स्‍वतःचा कल संपूर्ण समाजाला अथवा जीवनालाच गुरूकूल करता येईल का? याकडे आहे.

डॉ. अभय बंग,
सामाजिक कार्यकर्ते,
07138-255407, 255412
search@satyam.net.in

About Post Author