नाट्यसंगीताचा वारसा जपणारी तरुण पिढी

0
27

अंधेरीच्या ‘भवन्स कल्चरल सेंटर’तर्फे मराठी नाट्यमहोस्तव आयोजित केला गेला होता. मी त्यात ‘संगीत, कोणे एके काळी’ हे नाटक पाहिले, ऐकले. ते अप्रतिम वाटले.

‘मिथक’ संस्थेतर्फे नाटक सादर केले गेले. मी त्यांच्यामधील आशुतोष गोखले याच्याशी गप्पा मारल्या.

रुपारेल कॉलेजमधून पदवीशिक्षण पूर्ण करून, बाहेर पडलेली दहा-बारा मुले. त्यांना नाटकाविषयी आवड, आस्था आहे. त्यांनी २००६ साली ‘मिथक’ची स्थापना केली. ‘स्वत:ला पटेल व आवडेल असे नाटक करणे’ हा त्यांचा उद्देश. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये बर्याीच वेळा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यांनी २०११ साली, आतंरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत, प्रथमच संगीत एकांकिका सादर केली- ‘संगीत, कोणे एके काळी’. त्यात त्यांना दुसरा क्रमांक मिळाला.

‘चतुरंग’ची सवाई एकांकिका स्पर्धा असते. त्यात संपूर्ण वर्षभरात पहिला क्रमांक मिळवणा-या एकांकिकांना प्रवेश मिळतो. दुसरा क्रमांकप्राप्त ‘संगीत, कोणे एके काळी’ला अर्थातच त्यात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘मिथक’ची मुले-मुली नाराज होती. त्यावर त्यांनी, विशेषत: अद्वैत दादरकरने असा विचार केला, की आपण एकांकिकेतून बाहेर पडून, प्रायोगिक रंगभूमीवर संगीत नाटक सादर करुया! मग मंडळी उत्साहाने कामाला लागली.
एकांकिका द.मा. मिरासदारांच्या कथेवर आधारित आहे. त्याचे दोन अंकी नाटकात रूपांतर करून २९ नोव्हेंबर २०११ ला संगीत नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला.

‘मिथक’ हे नाव का व कसे ठेवले? असे विचारले असता आशुतोष म्हणाला, की mythology, myth या शब्दांवरून ‘मिथक’ हे नाव ठेवले. Myth म्हणजे पौराणिक कथा, त्या काल्पनिक, काही वेळेस अतिरंजित असतात, पण त्या स्वत:चे विश्व निर्माण करतात. आम्हालाही ‘आमचे विश्व’ निर्माण करायचे आहे, म्हणून ‘मिथक’!

आशुतोष म्हणाला, सुरुवातीला आम्ही जरी दहा-बारा जण होतो तरी अनेक समविचारी मुले-मुली, ‘मिथक’ला जोडली गेली. ‘मिथक’ हा चाळीस जणांचा ग्रूप आहे. त्यांतील जास्त मुले ‘रुपारेल’मधे शिकणारी आहेत.

आशुतोष गोखले व अद्वैत दादरकर हे भाऊ आहेत. त्यांनीच संगीत एकांकिकेचे रूपांतर नाटकात केले. संगीताविषयी त्यांच्याक़डून जाणून घेताना आशुतोषने सांगितले, की विद्याधर गोखले हे त्याचे आणि अद्वैतचे आजोबा, संगीत नाटके लिहीत होते. त्यामुळे आम्ही संगीताच्या वातावरणात लहानाचे मोठे झालो. आजोबांचा वारसा पुढे चालू ठेवायला हवा असे आम्हाला वाटते.

संगीत, नाटक सादर करायचे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक पाठबळ हवे. मुला-मुलींनीं कॉलेजतर्फे ज्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन, त्या जिंकलेल्या होत्या, त्यांनी त्यांचे बक्षिसाचे पैसे नाटकात घातले. ते जेमतेमच होते, मात्र मुलांनी नवीन कल्पना राबवून, नाटकाचा मूळ गाभा/कथा सादर केले. सौंदर्य जपले, त्यासाठी योग्य त्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुले मनापासून, समरसून काम करत होती. चाळीस जणांचा स्टेजवरील वावर सहज, उत्साहपूर्ण, जोशपूर्ण होता. त्यांच्या नेपथ्याच्या बाबतीतील कल्पना वाखाणण्यासारख्या होत्या.

‘संगीत, कोणे एके काळी’ हे नाटक तीन पात्रांभोवती गुंफलेले आहे. राजा कुबेर, विदूषक व मोहिनी. ती राजकुमारी आहे. विदूषकाचे नाटकातील नाव वक्रतुंड आहे. तो राजाचा आश्रित ब्राम्हण. विश्वासू, हुशार, चतुर. राजकुमारी मोहिनी ही लावण्यवती व बुद्धिमान. तिला आपल्या प्रियकराची निवड, तिच्या चतुर अशा संकेतांतून करायची आहे. तिचे प्राधान्य बुद्धिमत्तेला आहे, भौतिक सुखसाधनांना नाही.

राजाच्या आज्ञेनुसार, वक्रतुंड, त्याच्या चातुर्याने, मोहिनीचे संकेत कसे ओळखतो व आपल्या महाराजांना कशी मदत करतो हे जाणून घ्यायचे असेल, तर नाटकच अवश्य पाहायला हवे!

गायक कलाकारांचे आवाज छान आहेत. त्यांची गायनाची तयारी, त्यांचा रियाज उत्तम आहे. प्रेक्षक नांदीची सुरुवात झाल्या क्षणापासून नाटक संपेपर्यंत, अगदी मंत्रमुग्ध अशा अवस्थेत जातात. शुभदा दादरकरांची नाटकातील पदे अर्थपूर्ण व छान आहेत.

नाटकात विदूषक-वक्रतुंडाचे-काम कोणी केले होते रे? असे मी आशुतोषला विचारले. तेव्हा आशुतोषने जे उत्तर दिले, ते ऐकून मी थक्क झाले. आशुतोष म्हणाला, वक्रतुंडाचे नेहमी काम करणारा मुलगा, काही कामानिमित्त परगावी जाणार आहे, असे आम्हाला नाटक सुरू होण्याच्या चार-पाच तास आधी कळले. मग तेवढा वेळ प्रॅक्टिस करून ओंकार राऊत वक्रतुंडाची भूमिका सादर केली होती.
नाटक पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात विचारचक्र चालू झाले. त्याविषयी थोडेसे..

राजकुमारी मोहिनी लावण्यवती आहे व बुद्धिमानही आहे. आईवडिलांनी तिला, तिच्या संकेतांचा जो अर्थ सांगेल असा बुद्धिमान प्रियकर शोधण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. ती भौतिक सुखसाधनांना महत्त्व देत नाही. तरुण पिढी ही चंगळवादाकडे झुकलेली असल्याचे जाणवते. परंतु त्याला अपवाद असे ‘मिथक’ ग्रूपचे वर्तन आहे. ग्रूप अशा प्रकारचे नाटक सादर करतो हे कौतुकास्पद आहे.

वक्रतुंडाला, तो अतिशय हुषार व चतुर असूनही ज्या प्रसंगाला सामोरे जावे लागते ते पाहून, सध्याच्या युगातही या अशा घटना घडत असल्याचे आपल्याला दिसते, त्यांची आठवण झाली. एका नाट्यपदातील ओळी अचानक आठवल्या – मूर्ख भोगितो राजवैभवा पंडित फिरत भिकारी!

शेवटी, कै. पु.ल. देशपांडे यांना आयुष्यात भावलेले एक गूज त्यांच्या शब्दांत …

‘उपजीविकेसाठी आवश्यक असणार्याप विषयाचे शिक्षण जरूर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा.
पण तेवढ्यावर थांबू नका.
साहित्य, चित्र, संगीत,नाट्य, शिल्प, खेळ यांतला
पोटापाण्याचा एखादा उद्योग तुम्हाला जगवेल
पण
कलेशी जमलेली मैत्री, तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल.’

‘मिथक’च्या सर्व मुला-मुलींनी नाटकाशी, संगीताशी केलेली मैत्री अशीच वृद्धिंगत होवो.

पद्मा क-हाडे – ९२२३२६२०२९,
padmakarhade@rediffmail.com
आशुतोष गोखले– ९८७०८४९५९५
mithakmumbai@gmail.com

About Post Author