तीच ती चित्रे…

0
38
पटवर्धन यांनी चितारलेली श्री गणेशाची विविध रूपे

लक्ष्मण पटवर्धन      माझे वय ८ वर्षे पूर्ण आहे. मी  १९४६ साली ‘इंटरमिजिएट् ड्रॉइंग’ व त्यापूर्वी एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. या परीक्षांसाठी केलेल्या पूर्वतयारीचा फायदा स्थापत्यशास्त्रातील पदविका मिळण्यासाठी झाला. नोकरीमधील जून १९५५ ते सप्टेंबर १९९० या कालावधीत मला ड्रॉइंग कलेकडे कधीही लक्ष देण्याची आवश्यकता/निकड भासली नाही.

     मी निवृत्तीनंतर, १९९६ मध्ये मुलाकडे अमेरिकेत शिकागो येथे सहा महिने वास्तव्यास गेलो. तिथे  त्याच्या मित्राचा अडीच वर्षांचा मुलगा रोज दुपारी दोन तास आमच्याकडे येऊन आम्हा उभयतांबरोबर खेळत बसे. त्यावेळी मी त्याच्यासाठी चित्रे काढू लागलो व अशा रीतीने माझ्यातील सुप्‍त कलेचे पुनरुज्जीवन झाले!

पटवर्धन यांच्या चित्रांची प्रदर्शने भरवण्यात आली आहेत      तेव्हापासून मी पक्षी, कार्टून्स काढणे सुरू केले व त्या छोटुकल्यास एक दिवसाआड एखादे चित्र रेखाटून देणे सुरू केले. त्याला त्याचे इतके अप्रूप वाटे, की तो ते घरी नेऊन त्याच्या खेळायच्या खोलीच्या भिंतीवर चिकटवून ठेवण्यासाठी आई-वडलांच्या मागे लागे. अशा रीतीने, त्याच्या खोलीतील एक भिंत मी काढलेल्या चित्रांनी भरून गेली. आम्ही पुण्यास परतल्यावर, तो अमेरिकेतून फोनवरून आमच्याशी बोलत असे व “डॅडी पुन्हा केव्हा येणार? लौकर या” इत्यादी तगादेवजा गप्पा मारत असे.

     माझा मुलगा १९९८ साली सिलिकॉन व्हॅलीमध्ये सॅनफ्रान्सिस्कोजवळ बदलून गेला. तोपर्यंत त्याला मुलगी झाली होती. आम्ही उभयता तेव्हापासून दरवर्षी चार महिने त्याच्याकडे जाऊ लागलो. त्याच्या मुलीसाठी -‘रिचा’साठी- चित्रे काढणे सुरू ठेवले. पुढे, २००३ मध्ये त्याला मुलगा झाला. रिशीसाठीपण ‘चित्ररूपी संवाद’ सुरू ठेवला. दोन्ही नातवंडांत ही कला थोडीफार उतरली आहे! चित्रांतून मुलांशी संवाद साधतो याची जाणीव झाल्यामुळे मला चित्रकलेबद्दल अधिकच ओढ वाटू लागली.

पटवर्धन यांनी चितारलेली श्री गणेशाची विविध रूपे      माझा माझ्यापुरता छंद पुढे चालू राहिला. श्री गणपतीची विविध रूपे चितारताना, मला वेगळाच आनंद मिळत गेला. त्याचप्रमाणे मला पक्ष्यांची चित्रे काढण्याचा नाद लागला. मी साठ चित्रांचे एक प्रदर्शन पुण्याला ‘विरंगुळा केंद्रात’ भरवले. ज्येष्ठ नागरिक संघाने (डहाणुकर-हॅपी कॉलनी परिसर) हे प्रदर्शन भरवण्यात पुढाकार घेतला. त्यावरील अभिप्राय पाहता, सर्वांना ते खचितच आवडले!

     ‘वेळ कसा घालवायचा?’ ह्या प्रश्नाने मला कधीही धास्तावले नाही. चित्रे रेखाटण्यात, रंगवण्यात दोन-तीन तास कसे निघून जातात हे समजतही नाही. गंमत अशी वाटते, की गणपती वा पक्षी यांची तीच ती चित्रे परत परत काढताना, त्यांत रंग भरताना, त्यांबाबत विचार करत असताना कंटाळा कधी येत नाही! असा आहे माझा वृद्धापकाळातील चित्रकलेचा प्रवास! माझ्या ज्येष्ठ नागरिकत्वाच्या काळात माझा तो मोठाच आधार बनला आहे.

– लक्ष्‍मण ग. पटवर्धन
जी ३०१-३०२ अलकानंदा को.हौ.सो.,
शिवानंद गार्डन्स, कोथरुड,
पुणे – ४११०३८
फोन : (020) 25384859

नमुन्यादाखल, प्रदर्शनातील चित्रांवरील अभिप्राय :

श्रीगणेशाची वेगवेगळी रूपे फार सुंदर तर्‍हेने काढली आणि रंगवली आहेत. भविष्यात आणखी सुंदर चित्रांच्या प्रदर्शनाची व आम्हाला पाहण्याची संधी मिळावी. अभिनंदन.

कर्नल एस.व्ही.साठे

गणेशांच्या मूर्तींचे उत्कृष्ट प्रदर्शन. कलाकाराला लाजवेल असे. आमच्या एका इंजिनीयर मित्राच्या या कलाकृती. अतुलनीय. विशेष म्हणजे मूर्तीच्या चित्रांमध्ये जे योग्य व अनुरूप रंग भरले आहेत. त्यांच्यामुळे कलाकृती आणखी प्रेक्षणीय झाल्या आहेत. अभिनंदन व कौतुक!

प.चा.ब्राम्हणकर

योगासनासाठी विरंगुळा केंद्रातील हॉलमध्ये आलो तर क्षणभर वाटले, की एखाद्या गणेश हॉलमध्ये तर आलो नाहीत ना! गणेशाची एकापेक्षा एक सुरेख, विविध रूपे फ्री हॅंड मध्ये पाहावयास मिळाली. सकाळीच गजाननाचे अनपेक्षित मंगल दर्शन झाल्याने आम्ही सर्व जणी प्रफुल्लित झालो. कलाकाराच्या कलाकृतींना सलाम. त्यांना, त्यांच्या पुढील कलाकृतींना शुभेच्छा.

– विरंगुळा केंद्रातील योगासन व प्राणायाम वर्गास येणार्‍या भगिनी

About Post Author