कीर्तनाचे महानिर्वाण

कीर्तनाचे महानिर्वाण

– सुरेंद्र चौधरी

मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे!

कीर्तन-प्रवचनासाठी निविदा सूचना! त्यादेखील एका मंदिराकडून! पण त्यांचा तरी काय इलाज? आपण सर्व व्यवहारांचे सरकारीकरण होऊन दिले आहे. तसे मंदिर-ट्रस्टांचेदेखील झाले आहे. त्यांच्यावर धर्मादाय आयुक्तांचा अंकुश असतो. त्यामुळे त्यांना कीर्तनकार-प्रवचनकार यांच्या नेमणुकीसाठी टेंडरे मागवावी लागली. ते ‘लोएस्ट टेंडर’ स्वीकारतात की कीर्तनकारांच्या मुलाखती घेतात? यामुळे चिंता वाटते, कारण हा प्रश्न संस्कृतीचा असतो. सिमेंट-विटा पुरवण्याचा नसतो.

कीर्तन हे केवढे शक्तिशाली माध्यम होते समाज घडवण्याचे आणि त्यांचे ‘नेटवर्क’ केवढे जबरदस्त! नाशिकचे कीर्तनकार पार सोलापूर-रत्नागिरीपर्यंत जायचे. त्यांची नेमणूक कोण करत होते? त्यांच्या माध्यमातून त्यावेळी विद्वत्चर्चा चालत होत्या, ज्ञानाची देवाणघेवाण होई. अर्थात् त्यावेळी ज्ञानाला-तत्त्वज्ञानाला धर्माचा आधार होता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात राष्ट्रीय कीर्तनदेखील निर्माण झाले. आफळेबुवा सुभाषबाबू, सावरकर यांची आख्याने लावत.

माझे बालपण दादरला गेले. तेथील डी.एल.वैद्य रोडवर जाता-येताना कीर्तनसंस्थेची बुटकी इमारत नजरेत भरे. त्या संस्थेत जाऊन जाहिरात दाखवली. संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये ह्यांनादेखील अचंबा वाटला. ते म्हणाले, की एवढी मोठी कौपिनेश्वर ही संस्था. त्यांनी आमच्याकडे येऊन चौकशी करायला हरकत नव्हती. आमच्याकडे तयार कीर्तनकार असतात.

संस्थेमध्ये आजपर्यंत दोनशे विद्यार्थी कीर्तन शिकून तयार झाले. त्यांची निरनिराळ्या ठिकाणी कीर्तन-प्रवचने होत असतात. संस्थेत शिक्षण घेण्यास वयोमर्यादा नाही. त्यामुळे वय वर्षे सतरापासून सत्तरपर्यंतचे विद्यार्थी असतात. पाच-सात विद्यार्थ्यांचा गट करून त्यांना शिकवले जाते.

मला कीर्तनविषयक ग्रंथ आठवले. यशवंत पाठक यांच्या ‘अंगणातले आभाळ’ मध्ये कीर्तनकार कुटुंबातलेच वातावरण आहे. त्यांचे ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक. त्यांच्या पीएच.डी. संशोधनातून तयार झालेले.

कीर्तनातून मराठी नाटकांनी आकार घेतला आहे असे विधान नाट्यसमीक्षक पुष्पा भावे यांनी केले आहे. त्यांना मराठी नाटकांवर शेक्सपीयर, इब्सेन वगैरेंच्या रचनांचा प्रभाव आहे हे तेवढे पटत नाही. मला व्यक्तिश: सतीश आळेकरचे ‘महानिर्वाण’ फार मोह घालते. ते नाटक मनातून हटतच नाही. त्याचा नायक भाऊराव हा कीर्तनाच्या ढंगातच नाटक सादर करतो. त्या नाटकावर रा. ग. जाधव, कुमार केतकर, रेखा इनामदार यांनी केलेले भाष्यदेखील उपलब्ध आहे. गौरी देशपांडेने नाटक इंग्रजीत केले आहे.

रामदास दासबोधात कीर्तनाची महती सांगताना अनुप्रास अलंकाराचा एव्हरेस्टच उभा करतात!

कलयुगी कीर्तन करावे |
केवळ कुशल गावे |

कठीण ककश कुंटे सोडावे |
येकीकडे …|| १

खटखट खुंटून टाकावी |
खळखळ खळांसी नाकरावी |

खरेखोटे खवळो नेदावी |
वृत्ती आपुली…||२

(अखिल भारतीय कीर्तन संस्था, दादर व ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय यांचे आभार

 

सुरेंद्र चौधरी

प्रमिल –निवास

राघोबा शंकर रोड,

ठाणे (प), 400601

भ्रमणध्वनी : 9969829501

मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो!’
लोकमान्य टिळक

 

परंपरा कीर्तनसंस्थेची !

– राजेंद्र शिंदे

कीर्तनसंस्था ही विशेषत: महाराष्ट्रात एक लोकहितकारी संस्था आहे. हिचे महत्त्व प्राचीन शिक्षणपरंपरेतील लोकांना तर वाटतेच, परंतु अर्वाचीन शिक्षणपरंपरेतील कित्येक लोकांनीही हिचे महत्त्व वर्णले आहे.
डॉ. भांडारकर, ‘नाट्यकथार्णव’कर्ते शंकरराव रानडे, वामनराव मोडक, हरिपंत पंडित, रावबहादूर काळे इत्यादी काही विद्वान लोक तर विशेष प्रसंगी स्वत: कीर्तनकार बनून लोकशिक्षणाचे काम करत असत. न्यायमूर्ती तेलंग, न्या. रानडे, यांसारखी मंडळी देखील कीर्तनसंस्थेची पुरस्कर्ती होती.

पारंपारिक कीर्तनकार, पांरपारिक वेषभूषेत...लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, रावबहादूर चिंतामणराव वैद्य, शिवरामपंत परांजपे, कृष्णाजीपंत खाडिलकर, नरसोपंत केळकर व औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे तर वेळोवेळी कीर्तनसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.

लोकमान्य टिळक १९१८च्या जानेवारीत नागपूरात भरलेल्या पहिल्या कीर्तनसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते, की कीर्तनसंस्था समाजात धार्मिक नीती व श्रद्धा उत्पन्न करणारी अपूर्व अशी शक्ती आहे. समाजात विशिष्ट मताची परिस्थिती निर्माण करायची झाल्यास, मग ते मत राजकीय असो अथवा धार्मिक असो- त्यासाठी कीर्तनसंस्थेसारखे अन्य साधन नाही. इतकेच नव्हे तर माझे असे ठाम मत आहे, की ‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो!’ स्वराज्यात शिक्षणखात्याचा जर मी मंत्री झालो तर कीर्तनकार, पुराणिक व प्रवचनकार यांना खेडोपाडी हिंडण्यास सांगून त्यांच्याद्वारे शिक्षणप्रसाराचे काम करून घेईन.

भक्तीचे जे नऊ प्रकार आहेत, त्यांतील दुस-या स्थानी कीर्तन आहे. भक्तीचे नऊ प्रकार असे : १. श्रवण,
२. कीर्तन, ३. स्मरण, ४. पादसेवन, ५. अर्चन, ६. वंदन, ७. दास्य, ८. सख्य व ९. आत्मनिवेदन. या सर्वांत पहिल्या तीन प्रकारांवर व त्यांतही ‘कींर्तन’ भक्तीवर संतांनी विशेष जोर दिलेला दिसून येतो.

सगुण अथवा निर्गुण परमात्म्याचे संबोधक अशा शब्दांचे उच्चारण करणे याला कीर्तन म्हणतात. हे एकट्याने करायचे असते. अनेक जणांनी (एकत्र येऊन) मिळून हे केले तर त्यास ‘संकीर्तन’ म्हणतात.

कीर्तनापेक्षा संकीर्तनात विशेष चमत्कार दृष्टीस पडत असल्यामुळे ‘संकीर्तन’ कीर्तनापेक्षा विशेष श्रेयस्कर मानले जाते. मात्र हल्लीच्या काळात कीर्तन-संकीर्तनात भेद करत नाहीत. ते दोन्ही एकच मानतात.

कीर्तन-संकीर्तनाचे तीन प्रकार

१. गुणकीर्तन २. लीलाकीर्तन, ३. नामकीर्तन

१. गुणसंकीर्तन, २. लीलासंकीर्तन ३. नामसंकीर्तन

‘कीर्तना’चा महिमा मोठा आहे. त्यामध्ये  सामान्य जनतेचा सुलभतेने उद्धार होण्याची सोय असल्यामुळे नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले. व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते.

‘काळ’कर्ते शिवराम महादेव परांजपे यांचे कीर्तनाबद्दलचे उद्गार: ‘परमेश्वराच्या गुणसंकीर्तनापासून मनुष्याच्या मनामध्ये ज्या वृत्ती निर्माण व्हायच्या आणि उचंबळून यायच्या त्या अर्थातच परमेश्वरासारख्या उच्च आणि उदात्त स्वरूपाच्या असणार व त्यांच्यामध्ये सत्त्वगुण हाच प्रधान गुण असणार. अशा वृत्ती माणसाच्या मनामध्ये वरचेवर निर्माण होऊ लागल्या आणि त्यांची त्याच्या मनाला सवय लागत चालली, म्हणजे तो मनुष्य नराचा नारायण होण्याच्या मार्गाला लागला, असे म्हणण्याला काहीच हरकत नाही. हे जे महत्त्व, हा जो शुभ फलप्रद भावी परिणाम त्याची प्राप्ती सर्वांना व्हावी, हाच कीर्तनसंस्थेच्या प्रचाराचा आद्यहेतू असला पाहिजे.’

श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी स्वत: काव्य करून गात. त्यांना गाणेबजावणे याचा नाद लहानपणापासून होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना तुकाराम-रामदास यांचे अभंग गाताना ऐकले तेव्हा त्यांनी त्यांना “तुम्ही अंभग उगीच म्हणत बसता त्यापेक्षा कीर्तन का करत नाही?” असे विचारले. अशा प्रकारे, वडिलांनी त्यांना कीर्तन करण्यास प्रोत्साहन दिले. श्रीमंत बाळासाहेब पंत यांनी प्रथम दुस-यांच्या पद्यांवर कीर्तन केले. पण पुढे त्यांनी स्वत: परशुराम त्रिंबक यांच्या जन्मावर ‘त्र्यंबकाख्यान’ रचले. श्रीमंत पंतप्रतिनिधी कीर्तन करत हे ब-याच जणांना अज्ञात आहे. ते आपल्या वडिलांच्या सांवत्सरिक श्राध्दोत्सवात स्वत: कीर्तन करत आणि कीर्तनाचा आराखडा दरवर्षी स्वरचित नवीन करून लोकांस ऐकवत.

कीर्तन-संमेलन प्रसंगी अनेक विद्वान अध्यक्षांनी कीर्तन कसे असावे याविषयी विस्तारपूर्वक सांगितले आहे. पण बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांच्या प्रतिपादनांत विशेष हा, की त्यांनी प्रत्यक्ष कीर्तने रचून कीर्तन असे असावे हे कृतीने दाखवले आहे.

दासबोधात ‘कीर्तनांबद्दल ओव्या आहेत. त्यांतील निवडक ओव्या

सगुण कथा या नाव कीर्तन | अव्दैत म्हणिजे निरूपण |

सगुण रक्षून निर्गुण | बोलत जावे || (४-२-२३)

कीर्तन केले पोटासाठी | देव मांडिले हाटवटी |

आहा देवा बुद्धी खोटी | माझी मीच जाणे | ( ५-८-१९)

कीर्तन ही महाराष्ट्राची एक विशेष सांस्कृतिक परंपरा आहे. कीर्तनकाराला ‘हरिदास” म्हणतात. हरिदासी कीर्तनाची ‘पूर्वरंग’ आणि ‘उत्तररंग’ अशी दोन अंगे असतात. पूर्वरंगात अभंग वा गीत घेऊन त्या अनुषंगाने परमार्थपर निरूपण असते, तर उत्तररंगात त्याच विषयाचा दृष्टांत म्हणून रामायण, महाभारत, पुराणे यांतील किंवा ऐतिहासिक प्रसंगांचे आख्यान सांगितले जाते. कीर्तनात सर्व रसांचा परिपोष केला जातो. सभ्यतेच्या मर्यादा सांभाळणारा शृंगारही कीर्तनात वर्ज्य नसतो. कीर्तनकार ज्ञानी आणि बहुश्रुत हवा. म्हणजे त्याला ताला-सुराचे ज्ञान हवे. निवडक जुन्या-नव्या ग्रंथांचे, इतिहासाचे, काव्याचे, साहित्याचे वाचन हवे. प्रचलित सामाजिक, धार्मिक, राजकीय विषयांची किमान तोंडओळख हवी. भक्तिभाव, अल्पसंतोष नि:स्पृहता, सेवाभाव, ज्ञान आणि वक्तृत्व या गुणांनी युक्त असा कीर्तनकार, समाजाच्या उत्कर्षाला, समाजमाणूस घडवायला हातभार लावतो.

इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे कीर्तनसंस्थेतही या गुणांची ‘वानवा’ निर्माण झाली आहे; असे अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे (दादर, मुंबई) अध्यक्ष सुरेश उपाध्ये यांच्या निदर्शनास आणता ते म्हणाले, की असे भासते परंतु वस्तुस्थिती तशी नाही. आज विविध माध्यमांच्या कल्लोळात या क्षेत्रातील चांगलुपणाकडे दुर्लक्ष झाले आहे. तेथील यश झाकोळून गेले आहे.

राजेंद्र शिंदे
भ्रमणध्वनी : 9324635303
thinkm2010@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. वय माझे६५ मला वारकरी किर्तन
    वय माझे६५ मला वारकरी किर्तन भजन टाळ गायला शिकायचे आहे कुठे मिळेल शिकायला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here