असे चित्रपट, अशा आठवणी

1
43

सासवडचे संजय दिनकर कुलकर्णी. त्यांचे ‘असे चित्रपट अशा आठवणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिध्द झाले आहे. मराठी चित्रपटांच्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील लक्षणीय चित्रपट निर्मितीच्या त्या आठवणी आहेत. संजय यांचे आईवडील शिक्षकी पेशात. त्यांची जेजुरी येथे बदली झाली. त्यामुळे संजय यांना वयाच्या चौथ्या वर्षी जेजुरीला यावे लागले. दिलीपकुमार-वैजयंतीमाला यांच्या ‘नया दौर’चे चित्रिकरण त्यावेळी तिथे चालू होते. वडील दिनकरराव कुलकर्णी यांनी दिलीपकुमार यांचा सत्कार शाळेत घडवून आणला! ‘नया दौर’मधील दिलीपकुमार-अजित यांच्यातील टांग्याची शर्यत, त्यांची टेकडीवरील मारामारी हे चित्रिकरण जेजुरी परिसरात झाले. तो प्रभाव संजय यांच्या मनावर कायमचा कोरला गेला. त्याच्याच जोडीला, त्यांना दैनिकांत येणार्‍या चित्रपटांच्या जाहिराती पाहण्याचा छंद जडला. त्यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ट्रान्झिस्टरवर चित्रपटांची गाणी ऐकणे, संधी मिळेल तेव्हा तंबूतील चित्रपट पाहणे हेही सुरू झाले.

संजय दहावीला असताना आईवडिलांची बदली गराडे गावी झाली. तिथे दहावीचे वर्ग नव्हते. त्यामुळे संजय यांना जेजुरीतच ठेवण्यात आले. त्यावर्षी राजकपूरचा ‘जिस देशमें गंगा बहती है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो पाहण्यासाठी एक रुपया पाठवावा असे शालेय वयातील संजयने वडिलांना पत्रातून कळवले! वडील पण चित्रपटवेडे होते. त्यांनी मास्टर विनायक यांचा ‘ब्रम्हचारी’ अकरा वेळा पाहिला होता. वडिलांनी संजयला रुपया पाठवून दिला!

संजय कुलकर्णी खांडेकर-फडके यांच्या कादंबर्‍या, ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मोहिनी’ इत्यादी मासिके नियमित वाचत. त्यांना त्या काळात ‘मार्मिक’ चे ‘सिनेप्रिक्षान’ वाचल्याशिवाय चैन पडायचे नाही. ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. त्यांनी स.प. महाविद्यालयाच्या कला शाखेत प्रवेश घेतला. त्यामुळे त्यांना मोकळा वेळ बराच मिळू लागला. त्यांनी कॉलेजच्या पहिल्याच दिवशी ‘अलका’ टॉकीजमध्ये ‘सेव्हन ब्राईडस् फॉर सेव्हन ब्रदर्स’ हा इंग्रजी चित्रपट पाहिला. मग त्यांचा ‘अलका’, ‘डेक्कन’, ‘हिंदविजय’, ‘विजय’, ‘भानुविलास’ इथे ‘मॅटिनीं’चा रतीब सुरू झाला.

दरम्यान, वडिलांचे निधन झाले. संजय यांच्या आईवर कुटुंबाची जबाबदारी आली. संजय वृत्तविद्येच्या कमी खर्चातील अभ्यासक्रमासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात दाखल झाले. सुधाकर पवार तिथे शिक्षणप्रमुख होते. त्यांनी शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांना औरंगाबाद, नाशिकला नेले. संजय यांना तेथून परतताना नाशिक येथे नव्याने सुरू झालेल्या ‘देशदूत’मध्ये उपसंपादकाची नोकरी लागली. त्याचवेळी नाशिकमध्ये राजेश खन्नाच्या ‘दुश्मन’चे चित्रिकरण चालू होते. त्याबद्दल स्थानिक वार्ताहराने आणलेल्या बातम्यांना शीर्षक देण्याचे पहिले काम त्यांना करावे लागले. चित्रपटविषयक मजकुराशी तेथेच, पत्रकारितेच्या पहिल्या दिवसापासून त्यांची मैत्री जमली. ती पुढे कायम टिकली. त्यांनी ‘विशाल सह्याद्री’, ‘केसरी’ या वर्तमानपत्रांत नोकर्‍या केल्या.

सुधीर गाडगीळत्यांचा समवयस्क सुधीर गाडगीळशी परिचय झाला. वयाच्या बाविसाव्या वर्षी झालेली ती मैत्री चाळीस वर्षे अखंड टिकून आहे. सुधीरला नवे मित्र जोडण्याची, भटकण्याची हौस आहे. त्या तुलनेत संजय अबोल आणि मित्रांच्या गर्दीपासून Dnfhdlअलिप्त राहणारा. त्यांच्या मैत्रीबद्दल सुधीर म्हणतो, ‘पत्रकारितेला न शोभणारा मितभाषीपणा संजयमध्ये आहे. आम्ही दोघांनी असंख्य चित्रपट बरोबरीने बघितले. नटांवर, गाण्यांवर गप्पा मारल्या. संजय अबोल असला तरी तो गप्पांच्या ओघात एखादी मिष्कील टिप्पणी करतो’. देवयानी चौबळ त्यावेळी ‘साप्ताहिक मनोहर’साठी चित्रपटविषयक स्तंभलेखन करत. ‘आय राईट विथ नेकेड पेन’ असे बिनधास्त विधान करणार्‍या त्या. त्या पुण्यात आल्या, की काही लेखकांकडे जाताना सुधीरला वाटाड्या म्हणून बरोबर घेत. त्याच ‘देवी’च्या कृपेने सुधीर मुंबईतील हिंदी चित्रपटांच्या पार्ट्यांना हजर राहू लागला, त्याचे किस्से संजयला ऐकवल्यावर एक दिवस तो सुधीरला म्हणाला, “नट-नट्यांना भेटण्यासाठी नाही पण देवयानीला भेटण्यासाठी मला तुझ्याबरोबर मुंबईला ने.” ही आठवण सांगून सुधीर म्हणतो, “संजय त्याची रसिकता टिकवून आहे”.

त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीचे अंतरंग उलगडून दाखवणारे अनेक किस्से-आठवणी संजय यांच्या पुस्तकात आहेत. चित्रपट कलावंत, निर्माते-दिग्दर्शक यांच्या प्रत्यक्ष भेटी, प्रकट मुलाखती, दिवाळी अंकांमधील चित्रपटविषयक विशेष लेख, चरित्रे-आत्मचरित्रे, चित्रपटांच्या पत्रकार परिषदा इत्यादी माध्यमांमधून व आपल्या स्वत:च्या अनुभवातून संदर्भ जमा करत संजय दिनकर यांनी एका वृत्तपत्रात साप्ताहिक स्तंभलेखन केले. ते करताना, त्यांना इंटरनेटचाही थोडाबहुत उपयोग झाला. मात्र त्यांची खंत अशी आहे, की मराठी चित्रपटांचे संदर्भ मिळवणे खूप अवघड आहे. मराठी चित्रपटांच्या प्रिंटही उपलब्ध नाहीत. इंटरनेटसारख्या माध्यमावर जुन्या मराठी चित्रपटांविषयीची माहिती कमी मिळते. फार थोडे मराठी चित्रपट यू-ट्युबवर पाहता येतात. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पुण्यात आहे. तिथे मराठी चित्रपटांच्या जतनासाठी स्वतंत्र विभाग असावा. मराठी चित्रपटांच्या अभ्यासकांसाठी जुन्या-नव्या चित्रपटांचे, पटकथांचे, संवादलेखनाचे नमुने संग्रहित असणे गरजेचे आहे. पण याकडे कोणाचे लक्ष नाही.

संजय कुलकर्णी यांनी संजय दिनकर या नावाने बहुतेक लिखाण केले. त्यांनी जवळपास चार दशके चित्रपटविषयक वाचन-लेखन केले आहे. त्यातील निवडक या पुस्तकात समाविष्ट आहे. ‘असे चित्रपट अशा आठवणी’ या पुस्तकाची सुरुवात ‘प्रभात’ अस्ताला जात असताना निर्माण झालेल्या ‘रामशास्त्री’ चित्रपटावरील लेखाने होते. व्ही.शांताराम ‘शेजारी’ची नायिका जयश्री हिच्याशी विवाहबध्द झाले व त्यांनी स्वत:ला ‘प्रभात’च्या बंधनातून मुक्त करून घेतले. दामले-फत्तेलाल या जोडगोळीने ‘प्रभात’ची वाटचाल चालू ठेवली. परंतु लोकप्रिय चित्रपटनिर्मिती झाली नाही. तेव्हा रखडलेल्या ‘रामशास्त्री’चा विषय पुढे आला. पेशवेकालीन न्यायाधीश ‘रामशास्त्री’ यांच्यावरील त्या चित्रपटाची पटकथा के.बी.ढवळे यांची होती. दि.के.बेडेकर यांनी दामले-फत्तेलाल यांना सांगितले, की चित्रपट संपूर्णपणे ‘प्रभात’चा आहे. त्यामुळे त्यावर कोणा एकाचे नाव नको. श्रेयनामावलीशिवाय ‘रामशास्त्री’ प्रदर्शित झाला! त्या चित्रपटासाठी झटणार्‍या कलावंत-तंत्रज्ञांवर एक प्रकारे अन्यायच झाला.

लेखन, दिग्दर्शन, संगीत व नायकाची भूमिका अशा महत्त्वाच्या जबाबदार्‍या यशस्वी रीतीने पार पाडून, निर्मिती खर्चात जास्तीत जास्त बचत करून ‘सबकुछ पुलं’ म्हणून गौरवला गेलेला ‘गुळाचा गणपती’ १९५३ साली प्रदर्शित झाला. त्याचे त्यावेळी चांगले स्वागत झाले. मात्र त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे साधे निमंत्रणही पुलंना देण्यात आले नव्हते. पुलं व सुनिताबाई यांनी तिकिटे काढून पहिला खेळ पाहिला. त्याबाबत संजय यांनी पुलंना थेट प्रश्न विचारला असता त्यांना उत्तर मिळाले, “मानधन कसलं मी आणि सुनितानं सहा-सहा आण्यांची दोन तिकिटं काढून तो चित्रपट पाहिला!”  त्या काळातील निर्मात्यांबद्दल एका कार्यक्रमात पुलं म्हणाले होते, “निर्मात्याला आम्ही हत्ती मागितला तर तो म्हणे, या उंदरातच भागवून घ्या.” ‘गुळाच्या गणपती’च्या वेळेस ऐनवेळेला पेटीवादक न आल्याने गायक वसंतराव देशपांडे यांनी पेटी वाजवली होती.

‘गुळाचा गणपती’ हा पुलंचा सगळ्यात गाजलेला चित्रपट असे मत नोंदवून लेखक संजय कुलकर्णी  लिहितात, “फक्त चार्ली चॅप्लिन निर्मळ, हास्यस्फोटक कलाकृती निर्माण करतो असे नाही, तर प्रत्येक देशात, राज्यात चार्ली असतो, हे त्या चित्रपटाने सिध्द केले.”

राजा परांजपे यांनी तेवीस चित्रपटांचे दिग्दर्शन आणि चौसष्ट चित्रपटांत भूमिका केल्या. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांवरचे लेख पुस्तकात आहेत. राजाभाऊंनी ‘मेक वे ऑफ टुमारो’ या इंग्रजी चित्रपटावरून ‘ऊनपाऊस’ हा चित्रपट तयार केला. त्याबद्दल टिप्पणी करताना ‘केवळ इंग्रजी चित्रपटावरून बेतलेला म्हणून त्या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले नाही’ असे लेखकाने म्हटले आहे, मग ही बाब पुरस्कारासाठी शिफारस करणार्‍यांच्या लक्षात आली नाही का? असा प्रश्न पडतो. तसेच ‘ऊनपाऊस’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पिंजरा’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ इत्यादी गाजलेले चित्रपट इंग्रजी चित्रपटांवरून बेतलेले असल्याचे लेखकाने त्या लेखामध्ये नमूद केले आहे. ‘लाखाची गोष्ट’च्या काळात (१९५२) चित्रपटनिर्मितीच्या तंत्रात खूप सुधारणा आवश्यक होती. अशा काळात सकस कथा, उत्कृष्ट संवाद, प्रसंगनिष्ठ विनोद… ही ‘लाखाची गोष्ट’ची ताकद होती. म्हणून तो आजही ताजातवाना वाटतो असे लेखकाचे निरीक्षण आहे.

‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटातील नायकाची भूमिका राजा गोसावी यांना देण्याचे योजले गेले होते, परंतु श्रीपादचित्र या निर्मिती संस्थेचे एक भागीदार असलेल्या धुमाळ यांनी विरोध केल्यामुळे ती भूमिका राजा परांजपे यांना स्वत:ला करावी लागली अशी माहिती पुस्तकात आहे.

पुणे-नाशिक मार्गावर नारायणगावच्या थोडे पुढे मिसळीचे उत्तम ठिकाण आहे. तिथे सुधीर व राजा गोसावी यांच्याबरोबर मिसळ खाताना संजय यांनी राजाभाऊंना प्रश्न विचारला, ‘लाखाची गोष्ट’चे नायक म्हणून तुम्हाला किती मानधन मिळाले! राजाभाऊ ‘लाखाची गोष्ट’पासून मराठी चित्रपटसृष्टीत नावारूपाला आले. राजाभाऊ म्हणाले, ‘‘तो चित्रपट ज्या भानुविलास चित्रपटगृहात लागला होता. तिथे त्यावेळी मी तिकिट खिडकीवर बुकिंग क्लार्क म्हणून काम करत होतो. हिरोच्या मानधनापेक्षा तिकिटे ब्लॅकने विकून मिळालेले पैसे जास्त होते!’’

मराठी चित्रपटांत अनंत माने यांच्या तमाशापटांचे स्थान वेगळे आहे. ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘एक गाव बारा भानगडी’ या माने यांच्या सुपरहिट चित्रपटांवरचे वेगवेगळे लेख पुस्तकात आहेत. गाजलेल्या ‘नटरंग’ या चित्रपटाची मूळ कल्पना ‘सवाल माझा ऐका’मध्ये आहे असे कोणी म्हटले, तर त्यात वाईट वाटून घेण्याचे कारण नाही, असे मत लेखकाने बचावात्मक पध्दतीने नोंदवले आहे. त्याचप्रमाणे ‘बर्लिनसारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवल्या गेलेल्या ‘सामना’ चित्रपटाविषयी लेख लिहिताना ‘जब्बार पटेल यांनी दिग्दर्शन केले म्हणजे नेमके काय केले हा प्रश्न आजही अनेकांना पडलेला आहे’ असे धाडसी विधान करताना डॉ.जब्बार पटेल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत बजावलेल्या अजोड कामगिरीचे योग्य मूल्यमापन करण्याची संधी लेखकाने गमावली आहे. ‘सामना’चा खास निमंत्रितांसाठीचा खेळ पाहिल्यावर ‘यात व्हिज्युअल्स कुठं आहेत?’ असा खोचक (की खवचट) प्रश्न व्ही. शांताराम यांनी विचारला तेव्हा ‘विजय तेंडुलकर यांचे संवाद हेच व्हिजुअल आहेत’ असे नेमके उत्तर डॉ. मोहन आगाशे यांनी दिले होते. त्याशिवाय निळू फुले, डॉ. श्रीराम लागू अशा अव्वल कलाकारांना एकत्र आणणे, विजय तेंडुलकर यांच्याकडून पटकथा-संवाद मिळवणे, संगीतकार म्हणून भास्कर चंदावरकर यांच्यासारख्या प्रयोगशील प्रतिभावंताची योजना करणे हे दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात डॉक्टरांनी तुटपुंज्या पैशांत घडवून आणले. चित्रपटात त्या माध्यमाची सजग जाण असलेल्या समर नखाते यांचाही तेवढाच सहभाग होता. पस्तीस वर्षांपूर्वीचा तो चित्रपट वास्तव वाटतो हेच त्याचे यश आहे.’ अशी कबुली देणार्‍या लेखकाने जब्बार पटेल यांच्या कामगिरीची तपशीलात दखल घ्यायला हवी होती. मराठीतील उत्कृष्ट राजकीय चित्रपट म्हणून ते ‘सिंहासन’चा उल्लेख करतात.

उंबरठा चित्रपटातील एक दृश्‍यमध्यमवर्गीय मराठी गृहिणी घराचा ‘उंबरठा’ ओलांडून अनाथ महिलाश्रमाच्या सामाजिक कामात उतरते, तेथील गैरप्रकार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला स्वत:च्या कुटुंबातून व समाजातून किती प्रकारचा विरोध होतो हा एका स्त्रीच्या बंडखोरीचा विषय डॉ. पटेल यांनी ‘उंबरठा’ चित्रपटातून मांडला. त्या चित्रपटाची मूळ कल्पना शांता निसळ यांच्या कादंबरीवरून घेतली आहे. त्या कादंबरीचे नाव टाकण्याचे गडबडीत राहून गेले आहे. स्मिता पाटील हिच्या अभिनयशक्तीचा कस त्या चित्रपटातून दिसून आला. स्मिताने मराठीचा ‘उंबरठा’ ओलांडून हिंदीत प्रवेश केला, हे विधान अतिशय सरधोपट पध्दतीने करण्यात आलेले आहे. वास्तविक ‘सुबह’ या नावाने ‘उंबरठा’ हिंदीत प्रदर्शित झाला त्याच्या आधी बावीस हिंदी चित्रपट स्मिताच्या नावावर जमा होते! त्यांत ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘आक्रोश’, ‘चक्र’, ‘अर्थ’ या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. वृत्तपत्रीय स्तंभलेखनात घाईगर्दीत काही गफलती होतात. परंतु लेखन पुस्तकरूपाने प्रसिध्द होते त्यावेळेस त्यातील संदर्भ नीट तपासण्याची तसदी लेखकाने घ्यायला हवी.

हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेमुळे मराठी चित्रपटांची स्थिती प्रतिवर्षी अधिकाधिक बिकट होऊ लागली. हे १९६० च्या दशकात प्रकर्षाने जाणवले. वर्षाला जेमतेम दहा-पंधरा चित्रपट निर्माण होत. त्यांपैकी निम्मे चित्रपट चार आठवडेसुध्दा टिकायचे नाहीत. त्याच काळात, १९६५ मध्ये लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांच्या ‘मल्हारी मार्तंड’ या लावणीप्रधान चित्रपटाने महोत्सवी यश मिळवले.’फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा’ या लावण्यांनी धमाल उडवून दिली असे सांगताना लेखकाने दोन महत्त्वाची सत्ये सांगितली आहेत. एक म्हणजे या चित्रपटाचे संगीत-दिग्दर्शक वसंत पवार हे राम कदमांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात असे त्या काळात बोलले जात होते. परंतु लहरी स्वभाव आणि कामाचा कंटाळा यामुळे पवारांना विपन्नावस्था आली. तसेच ग.दि. माडगुळकर हे शहरी पांढरपेशांचे कवी, ते लावणी कितपत चांगली लिहू शकतील अशी शंका कोल्हापूर कडील व्यक्ती व्यक्त करत. त्याला ‘मल्हारी मार्तंड’मधील गदिमांच्या लावणीने परस्पर उत्तर दिले.

मराठी चित्रपटांना जागतिक दर्जाची प्रतिष्ठा मिळवून देण्याची बहुमोल कामगिरी प्रभात फिल्म कंपनीने केली. त्यात व्ही.शांताराम यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र पुस्तकात फक्त ‘पिंजरा’ चित्रपटावरचा लेख आहे, तर ‘पांडू हवालदार’ या चित्रपटात ‘गटारात पांडूला पिंजरा सापडतो’ असा हीणकस विनोद व्ही.शांताराम यांच्यावर करणार्‍या दादा कोंडके यांच्या सहा चित्रपटांची दखल घेण्यात आलेली आहे. ‘पिंजरा’ या लेखाच्या शेवटीसुध्दा ‘मास्तरकी सोडा आणि तमाशाच्या फूटबोर्डवर नाचा’ असा संदेश प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळत असल्याचे मत नोंदवून लेखकाने नेमके काय साधले ते समजत नाही. ‘आली ठुमकत, मान मुर्डत, मान लचकत, हिर्व्या रानी’ हे पिंजरा’ चित्रपटातील गाणे पुणे महापालिकेत काम करणार्‍या वाघमारे यांनी म्हटले होते अशी माहिती त्या लेखात मिळते.

सर्वसामान्य वाचकाला रोचक वाटेल अशा माहितीचा भाग या पुस्तकात बर्‍यापैकी आहे. ‘पाठलाग’ या चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांच्याबरोबर नवी नायिका म्हणून सुमन ताटे हिला घेताना राजा परांजपे यांनी तिचे ‘भावना’ असे नामकरण केले. ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटाने महोत्सवी यश मिळवल्यावर अनंत माने यांनी गणपत पाटील या तमाशापटातील नाच्याची भूमिका करणार्‍या नटास मुख्य भूमिका देऊन ‘सख्या सजणा’ हा चित्रपट केला. पण तो फारसा चालला नाही. त्यांचा ‘नार निर्मिते नरा’ हा सामाजिक समस्येवरील चित्रपट यश मिळवू शकला नाही. ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे सुधीर फडके यांनी शांतारामबापू यांच्यासाठी गायलेले पहिले गाणे. शांतारामबापूंनी एकेकाळी केलेल्या उपकारांची फेड बाबुजींनी अशा प्रकारे केली.

‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांच्याजवळ फारसे पैसे नव्हते. परिस्थिती बेताची असताना विनोदी कलाकृतींबद्दल ख्यातनाम असलेल्या अत्रे यांनी गंभीर असा तो चित्रपट काढला. जगदीश खेबुडकर यांनी त्यांची पहिली लावणी ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटासाठी लिहिली. दत्ता डावजेकर, छोटा गंधर्व आणि वसंत पवार असे तीन मातब्बर संगीतकार त्या चित्रपटाला लाभले.

कथाकल्पना चांगली असूनही ए.समशेर या अमराठी दिग्दर्शकाला मराठी विनोद खुलवता न आल्याने जॉनी वॉकर यांची मराठीतील पहिली भूमिका असलेला ‘श्रीमंत मेहुणा पाहिजे’ हा चित्रपट फसला. पोलंडचे एक चित्रपटतज्ञ प्रो.टोपोलिस यांनी मुंबईत ‘साधी माणसं’ हा चित्रपट पाहिल्यावर ते म्हणाले, “हा चित्रपट इंग्रजी सबटायटलसह पाठवलात तर मी तो युरोपात सगळीकडे दाखवण्याची सोय करेन. एवढा वास्तववादी चित्रपट तिकडे निर्माण होत नाही.”

वयाची चाळीशी पार करेपर्यंत दादा कोंडके यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’चे बरेच प्रयोग केले. त्यातून त्यांना पैसाही बर्‍यापैकी मिळाला. त्या भांडवलाच्या जोरावर एखादे लॉजिंग-बोर्डिंग सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. तेव्हा भालजी पेंढारकर यांनी दादांना चित्रपट काढण्यास सुचवले. भालजींनी वसंत सबनीस यांच्याकडून पटकथा-संवाद लिहून घेतले. सबनीसांच्या पहिल्या पटकथेवर दादांचा पहिला चित्रपट ‘सोंगाड्या’ तयार झाला. चाळीशी उलटलेल्या हाफ चड्डीतील नायकाचा चित्रपट प्रदर्शित करायला कोणी तयार नव्हते. त्या चित्रपटामुळे बर्‍याच कालावधीनंतर मराठीला रौप्यमहोत्सवी यश मिळाले.

चित्रकारकिर्दीत नवीन असताना अशोक सराफ ‘केसरी’च्या पेपर टॅक्सीने कोल्हापूरला जायचे. रात्रपाळीला असलेल्या संजय यांनी त्यांच्याशी मैत्री करून अनेक किस्से ऐकले. त्यांनी अनेकांशी असे व्यक्तिगत संबंध निर्माण केले. “पुस्तकात चित्रपटांच्या कथा कमी करून आठवणी थोड्या वाढवल्या असत्या, ‘श्रीमंत मेहुणा’सारखे लेख गाळले असते तर संजय यांना जास्त आठवणी लिहिता आल्या असत्या” अशी सूचना सुधीर गाडगीळ यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत केली आहे. पुस्तकाचे प्रकाशक ‘मन-रंजन प्रकाशना’चे मनोहर सप्रे हेसुध्दा पत्रकार आहेत. त्यांनी पुस्तक निर्मितीचा दर्जा उत्तम ठेवला आहे. एकशेसाठ पानांच्या पुस्तकाची किंमत एकशेपंचवीस रुपये आहे.

पाने- १६० , किंमत- १२५ रुपये
पुस्‍तक लेखक – संजय दिनकर कुलकर्णी
मन-रंजन प्रकाशन
मनोहर सप्रे, ९९६०४८८७३८

रमेश दिघे
भ्रमणध्वनी- ९४२३०४७४४०

About Post Author

1 COMMENT

  1. मराठी चित्रपट सुष्टीत मोठे
    मराठी चित्रपट सुष्टीत मोठे मोठे कलाकार झाले आणि होत आहेत. सर्वांनी हयाचा अभिमान राहून नवीन नवीन कलाकार तयार करून या चित्रपट सुष्टीचे नाव कसे उज्वल होईल याची महाराष्ट्राला

Comments are closed.