विश्वचरित्र कोशकार – श्रीराम कामत
श्रीराम कामत हे ‘विश्वचरित्रकोशाचा अखेरचा खंड’ आणि ‘बोरकरांचे समग्र साहित्य प्रकाशन’ असे दोन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करून निवृत्त होणार होते; पण, तोच मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला! त्यातील शोकात्म नाट्य असे, की कामत यांनी त्यांना कोशाच्या कामी मदत करणारे वाईचे सु.र. देशपांडे यांना मृत्यूच्या त्या रात्री तातडीने फोन केला. ते दोघे अर्धा-पाऊण तास बोलत होते. “आता, माझ्यानंतर उरलेले काम तुम्हालाच पूर्ण करायचे आहे. अन्य सहकारी मदत करतील. पण, मुख्य भार तुम्हाला उचलायचा आहे” असे ते आर्जवून सांगत होते. उलट, देशपांडे “ठीक आहे. मग बोलू. फार बोलू नका” असे त्यांना बजावत होते. त्यांचे ते संभाषण संपले आणि तासाभरात श्रीराम कामत यांची प्राणज्योत मावळली. त्यांना संशोधन कार्याच्या ध्यासात असा मृत्यू आला!
कामत यांनी विश्वचरित्र कोशाचे फार मोठे कार्य अंतिम टप्प्यापर्यंत आणून पोचवले होते, पण त्यांना त्या स्वप्नपूर्तीचा आनंद काही उपभोगता आला नाही. मात्र त्यांनी ‘विश्वचरित्रकोश’ या एकमेवाद्वितीय प्रकल्पाचे शिवधनुष्य जिद्दीने उचलले, त्याकरता तेहतीस वर्षें अथक परिश्रम केले. ‘महाराष्ट्राचा विश्वकोश’ प्रकल्प सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना पंचेचाळीस वर्षें रेंगाळला; श्रीराम कामत यांनी मात्र प्रचंड काम एकट्याच्या हिंमतीवर, आर्थिक पाठबळ नसताना तीसएक वर्षांत पूर्णत्वास नेले ही बाब कोणाही माणसाला अभिमानास्पद वाटावी अशीच आहे.